ग्रामविकास अधिकाऱ्याची राजकीय दबावाने झालेली बदली रद्द करण्याची मागणी
अन्यथा उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांचा उपोषणाचा इशारा

हिमायतनगर – हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बुद्रुक हे गाव काही ना काही कारणाने तालुक्यामध्ये प्रकाश झोतात असते. या गावाला आधी लाभलेले ग्रामविकास अधिकारी भोगे यांनी गावाच्या विकासाकडे लक्ष न देता वारंवार गैरसहजर राहील्याने गावकऱ्यांनी त्यांच्याविषयी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापर्यंत तक्रारी केल्या होत्या.
पण आता राजकीय दबावापोटी त्याच ग्रामपंचायत अधिकाऱ्याची सरसम येथे बदली करण्यात आली आहे. सध्या कार्यरत असलेल्या ग्रामसेवकाबद्दल व कामविषयी कोणत्याही तक्रारी नसतानाही त्यांची बदली करण्यात आली आहे. यामुळे गावकरी बांधव,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी थेट ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देत राजकीय दबावातून झालेली ग्रामसेवक यांची बदली रद्द करा अन्यथा आमरण उपोषण करू असा इशारा दिला आहे.
सरसम ग्रामपंचायत चे सध्याचे ग्रामविकास अधिकारी श्री कोंडामंगल हे त्यांचा कारभार सुरळीत चालवत असताना अचानक श्री भोगे यांची सरसम येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून बदली करण्यात आली. यापूर्वीही श्री भोगे यांनी सरसमचे ग्रामविकास अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
पण गावाच्या विकासाकडे लक्ष न देता वारंवार गैरहजर राहिल्याने गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रारी करून त्यांना बदलण्यात आले होते. पण आता त्यांना सरसम येथे बदली देण्यात आल्यामुळे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांनी थेट गटविकास अधिकारी यांना निवेदन देत भोगे यांना सरसम ग्रामपंचायतचा कारभार देऊ नये व ग्रामविकास अधिकारी श्री कोंडामंगल यांची बदली रद्द करा अन्यथा आमरण उपोषण करू असा इशारा उपसरपंच ऍड.अतुल वानखेडे, ग्रामपंचायत सदस्य नामदेव मोकासवाड, आम्रपाली कपिल कांबळे,अमोल कांबळे, ज्योती लालबा गायकवाड, पुष्पाबाई लक्ष्मण बिच्चेवार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
सरसम या गावांमध्ये राजकारणाचा पारा चढला असून निव्वळ राजकारण केले जात आहे अशी चर्चा सर्वत्र होत आहे.गावाच्या विकासाला मात्र कुठेही वाव दिसत नाही. यामुळे सरसममध्ये राजकारण जोमात आणि गावचा विकास मात्र कोमात अशी अवस्था पाहायला मिळत आहे.
सरसम चे ग्रामविकास अधिकारी श्री कोंडामंगल यांची बदली करण्याचे कारण काय व कोणाच्या दबावाखाली बदली करण्यात आली ? की विकास कामाच्या निधीमध्ये टक्केवारी मिळत नसल्याने ही बदली राजकीय कुरघोडीतून करण्यात आली आहे का ? अश्या अनेक प्रश्नाची चर्चा गावामध्ये होत आहे.या बाबीकडे गटविकास अधिकारी कोणत्या दृष्टीने बघतील व काय ॲक्शन घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.